पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार डॉ. चरणजित सिंह यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत चरणजित सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असतानाच हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चर्चा सुरू आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. दुसरीकडे पंजाब आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांत आगामी वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील नेतेमंडळी पक्षांतर करत असून आपल्या सोईच्या पक्षात जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बसलेला हा धक्का महत्त्वाचा मानला जात आहे.
## तिकीट नाकारल्याने नाराजी
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत डॉ. चरणजित सिंह यांना स्थान मिळाले नाही. चमकौर साहिब या जागेवर पक्षाने बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जसवीर सिंह गढी यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या चरणजित सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला. उमेदवारीवरून झालेली ही नाराजी त्यांच्या पक्षांतरामागील मुख्य कारण मानली जात आहे.
## यापूर्वी तीन आमदारांनीही सोडली साथ
डॉ. चरणजित सिंह यांच्या आधी आणखी तीन आमदारांनीही आम आदमी पक्षाची साथ सोडली होती. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी हरमीत सिंह पठानमाजरा, समानाचे आमदार चेतन सिंह जौड़ामाजरा आणि अमृतसर उत्तरचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह या तिघांनी राजीनामा दिला होता. या तिन्ही आमदारांनी नवी दिल्लीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र चरणजित सिंह हे एकमेव आमदार आहेत, ज्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आम आदमी पार्टीपुढे कोणते आव्हान उभे राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर आमदारांची ही गळती पक्षासाठी चिंतेची बाब ठरत आहे. आगामी काळात पंजाबमधील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा