एप्रिल २०२६ मध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ५४ मतांनी नामंजूर झाले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि द्रमुक यांची भूमिका निर्णायक ठरली होती. मात्र सात महिन्यांनंतर याच दोन पक्षांनी अचानक भूमिका बदलत विधेयकाला पाठिंबा दिला. या बदलामागे नेमके काय घडले, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. तृणमूल काँग्रेसवर मात्र वेगळीच कारवाई झाली. त्या पक्षाचे २० खासदार फुटले आणि अनेक आमदार पक्षाबाहेर पडले. पण राष्ट्रवादी आणि द्रमुकबाबत भाजपने वेगळे धोरण राबवले, असे सांगितले जात आहे.
तामिळनाडूत बदललेली समीकरणे
वर्षभरापूर्वी केंद्र सरकारने द्रमुकशी अनौपचारिक संवाद सुरू केला होता. तरीही तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही. या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेट्टी कळघम पक्षाने १०८ जागा जिंकल्या, तर द्रमुक ५४ जागांवरच अडकली. राज्यातील बदलत्या समीकरणानंतर काँग्रेसने द्रमुकची साथ सोडली आणि राहुल गांधी यांनी विजय यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात दुरावा निर्माण झाला. द्रमुकने लोकसभेत काँग्रेसपासून वेगळे बसण्याची विनंती केली, मात्र काँग्रेसने समजूतदारपणाची भूमिका घेतली नाही. फटकून आणि तुटक वागण्याचा वचपा आता द्रमुक घेत असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवणे, राज्यांचे १९७१ मधील गुणोत्तर प्रमाण कायम ठेवणे आणि २०५१ पर्यंत जागांचे प्रमाण न बदलण्याची हमी भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीत काय घडले?
राज्यात राष्ट्रवादीच्या दोनी गटांच्या विलिनीकरणाचे जोरकस प्रयत्न झाले. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधामुळे विलिनीकरण झाले नाही. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गट स्वतंत्र पक्ष म्हणून रालोआमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले होते. ऑगस्टमध्ये राष्ट्रवादीच्या आठ खासदारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पवार रुग्णालयात असताना मोदींनी त्यांच्याशी संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळतो, असे म्हटल्याचे वृत्त समोर आले होते. तेव्हापासून सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य मंत्रिपदाचीच नाही, तर राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना आपण चार संयुक्त संसदीय समित्यांवर असल्याचे सांगितले. डिलिमिटेशनविषयी राष्ट्रवादीने घेतलेल्या हरकती पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा