वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आता इंग्लंडचे माजी कर्णधार अॅलिस्टर कूक यांना या युवा भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडावी, असे वाटते. वैभवकडे अशी विलक्षण प्रतिभा आहे, जी त्याला कसोटी क्रिकेटमध्येही एक विशेष खेळाडू बनवू शकते, असा विश्वास कूक यांनी व्यक्त केला आहे.
कूक यांनी वैभवची खूप प्रशंसा केली. प्रत्येक पिढीला एका प्रेरणादायी खेळाडूची गरज असते, ज्याच्याकडे मुले आदर्श म्हणून पाहू शकतील, असे ते म्हणाले. वैभवने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हे यश मिळवले, तर ती कसोटी क्रिकेटसाठीही एक मोठी उपलब्धी ठरेल, असे त्यांचे मत आहे. “त्याच्याकडे अशी प्रतिभा आहे, जी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. मला आशा आहे की, तो कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासही उत्सुक असेल,” असे कूक म्हणाले.
वैभवचे विक्रमी पराक्रम
वैभव सूर्यवंशीने इतक्या लहान वयात बॅटने केलेले पराक्रम आश्चर्यकारक आहेत. २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या बॅटने धुमाकूळ घातला. वैभवने संपूर्ण हंगामात ७७६ धावा केल्या आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याच काळात त्याने विक्रमी ७२ षटकारही ठोकले.
नुकतेच दोहा येथे झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये वैभवने अशी धुमाकूळ घातली की संपूर्ण क्रिकेट जग थक्क झाले. युएईविरुद्ध इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये २०४ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत २८ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. वैभवने अवघ्या २८ चेंडूंमध्ये आपले शतक आणि ५२ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आणि सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम प्रस्थापित केला.
कसोटी क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज
कसोटी क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज आहे, जे जोखीम पत्करण्यास तयार असतात, असे कूक यांनी सांगितले. वैभव व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो आणि हा तरुण फलंदाज रेड-बॉल क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी करत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज आहे, जे आपल्या खेळाने पुढच्या पिढीला प्रेरणा देऊ शकतील, असे कूक यांचे म्हणणे आहे. वैभवची फलंदाजीची शैली आक्रमक आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्यावर त्याचा विश्वास आहे. मात्र कसोटी क्रिकेट फलंदाजासाठी एक वेगळीच परीक्षा असते. त्यासाठी पाच दिवसांचा संयम, तंत्र आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता लागते. वैभव ही परीक्षा कशी पार पाडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा