पुण्यात ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील रायफल प्रकारातील स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. येत्या २३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर राष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठेची स्पर्धा पुन्हा एकदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या वतीने बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील नेमबाजी केंद्रावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे महासचिव पवन कुमार सिंह उपस्थित होते.
दहा वर्षांनंतर पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा
या स्पर्धेत देशभरातील सुमारे ७५०० नेमबाज सहभागी होणार असून, यामध्ये पुरुष, महिला आणि पॅरा नेमबाजांचा समावेश आहे. रायफल प्रकारातील विविध स्पर्धांमध्ये हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. बालेवाडी येथील नेमबाजी केंद्रावर पुढील काही आठवडे देशभरातील नेमबाजांची चुरस पाहायला मिळणार आहे.
देशातील आघाडीचे नेमबाज सहभागी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारा स्वप्नील कुसळे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, विश्वविजेता रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, ऑलिम्पियन अंजुम मौदगिल, माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज आणि दोन वेळची ऑलिम्पियन एलावेनिल वलारिवन तसेच लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवलेला निरज कुमार यांसारखे देशातील आघाडीचे नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा