आजकाल फिटनेसशी संबंधित अनेक गॅजेट्स बाजारात आली आहेत. विविध फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच हृदयाचे ठोके, झोपेचे चक्र आणि नाडी यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. मात्र, सध्या कपाळावर लावायचे एक छोटे उपकरण चर्चेत आहे, जे अनेक प्रसिद्ध व्यक्ती वापरताना दिसतात. अलीकडेच पीव्ही सिंधू आणि शुभमन गिल यांसारखे प्रसिद्ध खेळाडूही ते वापरताना दिसले. हे लहान उपकरण एखाद्या चीपसारखे कपाळाच्या बाजूला लावले जाते. हे नक्की काय आहे, याचा काय फायदा आहे आणि खेळाडू ते का वापरतात, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
टेम्पल डिव्हाइस म्हणजे काय
पीव्ही सिंधू, शुभमन गिल, राज शमानी, गझल अलघ आणि दीपेंद्र गोयल यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या कपाळाजवळ एक छोटे उपकरण लावलेले दिसले आहेत. टेम्पल नावाचे हे उपकरण दीपेंद्र गोयल यांच्या टीमने विकसित केले आहे. या उपकरणाची किंमत सुमारे ८५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे उपकरण मेंदूतील रक्तप्रवाहावर लक्ष ठेवते, असा दावा केला जात आहे. ते कपाळाजवळ ठेवले जाते, जिथे सेन्सर्स त्वचेखालील रक्तवाहिन्यांमधून येणारे संकेत वाचतात. या डेटाचे विश्लेषण एका वेगळ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाते. त्यातून अंतर्गत आरोग्य, वृद्धत्व आणि पुनर्प्राप्ती यांबद्दल सखोल माहिती मिळू शकते, असा दावा केला जातो.
कोणते फायदे आणि काय काळजी घ्यावी
हे डिव्हाइस मेंदूतील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनच्या पातळीवर सतत आणि रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवते. झोप, मानसिक ताण, कॅफिन, व्यायाम आणि ध्यानधारणेचा मेंदूवर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे डिव्हाइस १ ते २५० दरम्यानचा एन्ट्रॉपी नावाचा लाईव्ह स्कोर दाखवते. प्रगत सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हे डिव्हाइस वापरकर्त्याला एकाग्रता, स्मरणशक्ती आणि थकव्याबद्दल अचूक माहिती देते. वाढत्या वयानुसार मेंदूतील रक्तप्रवाहात होणारे बदल आणि दीर्घायुष्य समजून घेण्यासाठी या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे.
केवळ प्रसिद्ध व्यक्ती वापरतात म्हणून महागडे गॅजेट खरेदी करणे आवश्यक नाही. मात्र, जर ८५ हजार रुपये सहज परवडत असतील, तर एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. पण हे लक्षात ठेवावे की, याकडे केवळ फिटनेस आणि वेलनेस ट्रॅकिंग गॅजेट म्हणूनच पाहावे, कोणत्याही आजाराचे निदान करणारे वैद्यकीय उपकरण म्हणून नव्हे.
प्रतिक्रिया व्यक्त करा