भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1 ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत देशभरात ‘सेवा दूत अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
## योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे
या कार्यशाळेत अभियानाचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याबरोबरच शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक स्तरावर समन्वय साधून काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
## कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, खासदार भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या अभियानात कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा