, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू: राहुल गांधी

केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी म्हणाले, हे विधेयक हाणून पाडण्यासाठी आम्ही जीवापाड प्रयत्न करू.

विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू: राहुल गांधी

केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत चालेल, तर राज्यसभेचे अधिवेशन २ आणि ३ डिसेंबरला होईल. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीत आपल्या संसदीय समितीची बैठक घेतली. बैठकीत विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विधेयकाला विरोध करण्याची ठाम भूमिका मांडली.

विरोधी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न

गेल्या वेळी ज्या पद्धतीने प्रयत्न केले होते, त्याच पद्धतीने हे विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू, असे राहुल गांधी बैठकीत म्हणाले. सर्व विरोधी पक्षांना सोबत घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, मात्र अनेक गोष्टी त्या-त्या पक्षांच्या भूमिकेवरही अवलंबून असतील, असेही त्यांनी नमूद केले. यामध्ये द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आव्हाड यांची भूमिका वेगळी

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते, त्याला पर्याय नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. शरद पवार यांनी आपल्याला अनौपचारिक चर्चेत पुनर्रचना गरजेची असल्याचे सांगितल्याचे आव्हाड म्हणाले. पवारसाहेबांची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असेही आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. उद्या किंवा परवा पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असेही आव्हाड यांनी सांगितले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance