पुण्यात अतिक्रमण आणि अवैध होर्डिंगविरोधात महापालिकेची जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनाही पालिकेच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून घरचा आहेर देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या रडारवर महापौरही आल्याचे दिसून येत आहे. या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
“माझेही नाव पुरस्कारांच्या यादीत टाका”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून पुणे महापालिका प्रशासनाचे मनापासून कौतुक केले. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे; वाहनांसाठी आणि पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. नियम केवळ शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचेही असतात आणि त्यांचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणे हाच असतो, असे त्यांचे म्हणणे होते. बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्याची नव्हे, तर सर्वत्रची मोठी समस्या असून त्यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. पुण्याने स्वीकारलेल्या अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पनेचेही त्यांनी कौतुक केले. “उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर माझेही नाव तुमच्या पुरस्कारांच्या यादीत टाका,” असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. नागपूर येथे येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तिथेही बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरू होईल, त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रूप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम
पुणे महापालिकेने २४ नोव्हेंबर रोजी अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी ‘bhauflexkadha.pmc.gov.in’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून नागरिक तिथे अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र काढून अपलोड करू शकतात. सर्वाधिक फ्लेक्स ज्यांचे आढळतील, त्यांचे नाव आणि छायाचित्र २४ तासांत संकेतस्थळावर ‘विद्रूपीकरण पुरस्काराचे’ मानकरी म्हणून प्रसिद्ध केले जाणार आहे. पहिल्या पुरस्काराचे मानकरी एका पक्षाचे पदाधिकारी ठरले असून त्यात स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे समाविष्ट आहेत. व्यावसायिक गटामध्ये ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांची नावे जाहीर झाली आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा