पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ५१२.१ किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या मिठाईची किंमत २ लाख ८८ हजार २०० रुपये इतकी आहे. एफडीएच्या आठ पथकांनी ही तपासणी केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अशा कारवाया सुरू आहेत. यापूर्वी अनेक मोठ्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली होती. आता प्रशासनाने आपला मोर्चा मिठाई व्यावसायिकांकडे वळवला आहे.
तपासणीत आठ दुकानांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आली, तर काही दुकानदार परवानाच नसताना मिठाई विकत असल्याचे समोर आले. नाशवंत असल्यामुळे जप्त केलेली मिठाई नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे पुण्यातील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
परवान्याशिवाय विक्री करणाऱ्या दुकानांवर नोटीस
बुधवार पेठ परिसरातील मंगलमूर्ती पेढे, श्रीमंत पेढेवाले, श्री मंगल मूर्ती, धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स, जय गणेश स्वीट सेंटर, अथर्व स्वीट सेंटर, हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र आणि श्री कृपा दुग्धालय या दुकानांची तपासणी करण्यात आली. यापैकी श्री मंगल मूर्ती आणि हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र यांच्याकडे विक्रीचा परवानाच नव्हता. परवान्याशिवाय विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगल मूर्ती मिठाई सेंटरला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र नोंदणी प्रमाणपत्राशिवाय चालवले जात असल्याचेही तपासणीत उघड झाले.
श्रीमंत पेढेवाले येथून २१५ किलो, तर श्री मंगल मूर्ती येथून १९५ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. जप्त केलेल्या मिठाईमध्ये खव्याचे मोदक, मोतीचूर लाडू, बेसनाचे लाडू आणि विविध दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होता.
१७ नमुने तपासणीसाठी घेतले
या कारवाईदरम्यान मिठाईच्या पदार्थांचे १७ नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात ३० नोव्हेंबर रोजी तडतोड अर्ज दाखल केला जाणार आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे पुण्यातील मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाची कडक नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा