पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात एक संशयित बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून बॅगची आणि परिसराची तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात एका व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याची चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
परिसर मोकळा करून तपासणी सुरू
स्थानिकांनी संशयित बॅगबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेत परिसर मोकळा करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
बॅगमध्ये नेमके काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येऊ शकेल. सध्या बॅगची कसून तपासणी सुरू आहे.
धमकीच्या ईमेलनंतर यंत्रणा सतर्क
पुणे आणि मुंबईसह राज्यातील न्यायालये तसेच पालिका बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्यभरातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी महापालिकेला बॉम्बसंदर्भात ईमेल आला होता, त्यानंतर न्यायालयाला दोन वेळा असे ईमेल प्राप्त होऊन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळण्याची ही तिसरी घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. पुण्यात सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने समोर येत असल्याने सुरक्षा यंत्रणांवरील ताण वाढला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा