भारतातील वाहन उद्योगात फोक्सवॅगन आणि केंद्र सरकार यांच्यातील करवाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. हा वाद तब्बल १०,५०० कोटी रुपयांच्या कर मागणीशी संबंधित असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि किया कंपन्यांचाही उल्लेख झाला आहे.
फोक्सवॅगनवर आरोप काय आहे
रॉयटर्सच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतीय कर अधिकाऱ्यांनी फोक्सवॅगनवर कारच्या सुट्या भागांच्या आयातीमध्ये चुकीचे वर्गीकरण केल्याचा आरोप केला होता. कंपनी ऑडी, स्कोडा आणि फोक्सवॅगनच्या कारसाठी लागणारे शेकडो पार्ट्स वेगवेगळ्या शिपमेंटमध्ये भारतात मागवत होती. या पार्ट्सना स्वतंत्र सुटे भाग म्हणून दाखवून कंपनीने ५ ते १५ टक्के आयात कर भरल्याचा आरोप आहे. सरकारच्या मते, प्रत्यक्षात हे पार्ट्स पूर्ण कारच्या सीकेडी (कंप्लीटली नॉक्ड डाऊन) किटचा भाग होते. अशा किटवर ३० ते ३५ टक्के आयात कर लागू होतो. त्यामुळे कमी कर भरून कंपनीने १२ वर्षांच्या कालावधीत सरकारी महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोक्सवॅगनने हे आरोप नाकारले असून कर मागणीला न्यायालयात आव्हान दिले आहे.
इतर कंपन्यांचा उल्लेख का झाला
या प्रकरणात फोक्सवॅगनने मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि किया या कंपन्यांची उदाहरणे दिली होती. या कंपन्याही वाहनांचे सुटे भाग आयात करताना अशाच पद्धतींचा वापर करतात, असा दावा कंपनीने केला होता. मात्र केंद्र सरकारने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे सांगत फेटाळला आहे. आता या करवादावर न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा