डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. मात्र, रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण डोळ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. सतत मोबाईल पाहणे, पुरेशी झोप न घेणे, डोळे वारंवार चोळणे किंवा योग्य आहार न घेणे अशा छोट्या वाटणाऱ्या सवयींचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या सवयींचे दुष्परिणाम सुरुवातीला जाणवत नाहीत; मात्र कालांतराने डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
डोळ्यांवर ताण आणणाऱ्या सवयी
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर टाळणे कठीण झाले आहे. मात्र, तासन्तास स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांत जळजळ होणे, डोकेदुखी आणि धूसर दिसणे अशा समस्या उद्भवू शकतात. यासाठी २०-२०-२० नियम पाळावा. दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तूकडे किमान २० सेकंद पाहावे. सूर्याच्या अतिनील किरणांचा डोळ्यांवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्यांचा धोका वाढू शकतो. बाहेर जाताना यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून संरक्षण देणारे सनग्लासेस वापरणे आवश्यक आहे.
स्वच्छतेच्या चुका आणि काळजी
डोळ्यांना खाज किंवा थकवा जाणवल्यास अनेकजण हाताने डोळे चोळतात. मात्र, हातावरील धूळ आणि जंतू डोळ्यांत जाऊन संसर्ग होऊ शकतो. सतत जोराने डोळे चोळल्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे डोळे चोळण्याची सवय टाळावी. कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लेन्स व्यवस्थित स्वच्छ न केल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. पुरेशी झोप आणि योग्य आहारही डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा