अमरावती शहराची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या राजकमल रेल्वे पुलाच्या पाडकामाने आता अंतिम टप्पा गाठला आहे. गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन चौक ते बेलपुरा दरम्यानचा रस्ता बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यानंतर पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने काही तासांतच पुलाचा वरचा भाग जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गापैकी एक असलेला हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
## नवीन पूल होईपर्यंत रस्ता बंदच राहणार
विशेष म्हणजे, हा मार्ग काही दिवसांसाठी नव्हे, तर नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बेलपुरा, राजापेठ आणि इर्विन चौक परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळ पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. यामुळे शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. तथापि, राजकमल चौक ते जयस्तंभ चौक या दरम्यानचा उड्डाणपुलाचा भाग सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, बांधकामाच्या पुढील टप्प्यात हा भागही बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
## पुनर्बांधणीसाठी १२५ कोटींचा खर्च अपेक्षित
राजकमल रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महारेल आणि एल अँड टी समूहामार्फत हा प्रकल्प राबविला जात आहे. दरम्यान, पुलाच्या पाडकामानंतर निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणातील ढिगाऱ्याची विल्हेवाट लावणे हेही कंत्राटदारासमोर आव्हान ठरले आहे. ढिगारा कोठे साठवायचा, याबाबत निर्णय होणे बाकी आहे. नवीन पूल उभारला जाईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा