सातारा-पंढरपूर मार्गावर अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्यांची कामे रखडली आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पोहोच रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयासमोरील रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे आणि कालव्यावरील पुलाचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. माहुली तसेच वसना नदीवरील पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा-पंढरपूर रस्त्यावरील रखडलेली कामे तसेच माहुली आणि कोरेगाव येथील पुलांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
मंत्रालयात महत्त्वाची बैठक
सातारा-पंढरपूर रस्त्यावरील माहुली व कोरेगाव परिसरातील पूल आणि मोरी कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भूषवले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब पंडितराव नागरगोजे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सातारा-पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे, पुलांचे रुंदीकरण तसेच सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोणती कामे रखडली आहेत?
माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे मंत्री म्हणाले. रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खावलीजवळील अरुंद पूल आणि रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील वसना नदीवरील ल्हासुर्णे येथे नवीन पुलाचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट आहे. कोरेगाव शहरातील तिळगंगा नदीवरील अस्तित्वातील पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम व रुंदीकरण करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली असून, काही ठिकाणी पूर्ण झालेली कामे उखडून खराब झाल्याचेही निदर्शनास आले आहे. बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी विविध कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मात्र, नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता, रखडलेली कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा, असे निर्देश मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
प्रतिक्रिया व्यक्त करा