राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर असून त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. संविधान दिनानिमित्त पर्यावरण विभागाकडून रायगडावर गडांचा मान-संविधानाचा सन्मान हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार ज्योती वाघमारे आणि शिवसेनेचे आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री व्हावेत, असा विश्वास व्यक्त केला.
आषाढी पूजेचा संदेश लाडक्या बहिणींकडून
एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली, असे ज्योती वाघमारे म्हणाल्या. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होऊन आषाढीची पूजा पंढरपुरात करावी, असा संदेश राज्यभरात फिरताना लाडक्या बहिणींनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे केवळ भोसलेंचे नसून संपूर्ण रयतेचे होते, असेही त्या म्हणाल्या. स्वराज्यात छत्रपतींनी जे प्रत्यक्षात आणले, त्याला रूप देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसवर हल्लाबोल, शिंदेंच्या कामाचे कौतुक
यावेळी ज्योती वाघमारे यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. संविधानामुळे चायवाला पंतप्रधान आणि रिक्षावाला मुख्यमंत्री बनला, असे त्या म्हणाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर पंचशीलाचे गुंज गुंजले, असेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या लेकीला खासदार बनविणारे अनेकजण आहेत, मात्र भीमाच्या लेकीला खास बनवून खासदार बनवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सांगत त्यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. गडकिल्ल्यांचे पावित्र्य आणि मांगल्य राखणे ही आपली जबाबदारी असून हे गडकिल्ले प्लास्टिकमुक्त व्हायला हवेत, असेही कार्यक्रमात सांगण्यात आले.
प्रतिक्रिया व्यक्त करा