पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याच्या विरुद्ध भूमिका मांडली आहे. पुण्याचं पालकत्व जर मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर पुण्याचं वाटोळं होईल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवारांना ताकद देण्याची मागणी
सध्याच्या पालकमंत्र्यांना अजित पवार यांच्यासारखं काम करता येत नाही, असं रोहित पवार म्हणाले. पुण्याला कठोर पालकमंत्री द्या, किंवा सुनेत्रा पवार यांना ताकद द्या, अशी मागणी त्यांनी केली. याद्वारे त्यांनी सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांवर एकाचवेळी टीका केल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांचा प्रशासनावर वचक आणि दरारा होता, त्यामुळे त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असेही रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत, त्यांच्या राजकारणाची आता सुरुवात आहे, त्यामुळे त्यांच्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांना मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.
गृहखात्याच्या अपयशाचा आरोप
पुण्यातील घटना हे राज्याच्या गृहखात्याचं अपयश असल्याचे रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असून त्यांचं खातं गुन्हे रोखण्यात अपयशी ठरलं आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे एक पुणेकर म्हणून पुण्याचं पालकत्व मुख्यमंत्र्यांना देऊ नये, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ते जर पुण्याचे पालकमंत्री झाले तर वाटोळं होईल, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनाच ताकद द्यावी. त्यांना काम करता येत नसेल तर एखाद्या कार्यक्षम व्यक्तीला पालकमंत्री म्हणून द्यावं, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा