वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आता तरुण वयातही केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केसांमध्ये एक-दोन पांढरे केस दिसताच आपण ते लगेच उपटून काढतो. पण पांढरे केस उपटून काढणे योग्य आहे का, याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पांढरे केस उपटल्याने काय होते?
पांढरे केस जबरदस्तीने उपटून काढल्याने केसांच्या मुळांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे त्या भागातील केस विरळ होण्याची शक्यता वाढते. वारंवार एकाच जागी केस उपटल्याने टाळूवर जळजळ किंवा त्वचेवर डाग पडण्याचा धोका वाढू शकतो. तसेच केसांच्या मुळांना त्रास झाल्याने केस गळण्याची समस्या वाढू शकते.
केस अकाली पांढरे का होतात?
पुरेशी झोप न घेतल्याने शरीरातील नैसर्गिक संतुलन बिघडते आणि केस गळतात किंवा पांढरे होतात. कामाचा किंवा मानसिक तणाव दीर्घकाळ राहिल्यासही केसांच्या आरोग्यावर परिणाम दिसू शकतो. आहारात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असल्यास केस अकाली पांढरे होऊ शकतात. कुटुंबात लवकर केस पांढरे होण्याची समस्या असल्यास अनुवंशिकतेमुळे तरुण वयातही केस पांढरे होतात. ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा