नागपुरात आईच्या निधनानंतर अवघ्या बारा दिवसांतच मुलाचाही मृत्यू झाल्याने नरदोडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनाचा मानसिक धक्का सहन न झालेल्या ४० वर्षीय अभिजित मुकुंद नरदोडकर यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरात आईच्या बाराव्या दिवसाच्या विधीची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील मुकुंद आणि भाऊ अनुराग असा परिवार आहे.
दोन वर्षे आईची पूर्णवेळ काळजी
मेधा नरदोडकर यांचे बारा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. गेल्या दोन वर्षांपासून अभिजित त्यांची पूर्णवेळ काळजी घेत होते. आईच्या निधनाचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर ते अस्वस्थ होते आणि फारसे कुणाशी बोलत नव्हते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.
विधीची तयारी सुरू असतानाच झटका
गुरुवारी आईच्या बाराव्या दिवसाच्या पूजेची तयारी घरी सुरू होती. त्याचवेळी सकाळी अभिजित यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या स्मृत्यर्थ सुरू असलेले विधीही संपले नसताना मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा