सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. सीतेला राक्षसांशी लढताना दाखवण्यावरून काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र सीतेच्या भूमिकेवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आजपासून तब्बल ७८ वर्षांपूर्वी अभिनेत्री शोभना समर्थ यांनाही सीतेची भूमिका साकारल्यामुळे अशाच टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या.
१९४२ पासून सीतेची ओळख
शोभना समर्थ या अभिनेत्री काजोल यांच्या आजी आहेत. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भरत मिलाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा सीतेची भूमिका साकारली होती. त्यानंतर १९४३ मध्ये आलेल्या ‘राम राज्य’ चित्रपटातही त्या सीतेच्या भूमिकेत दिसल्या. या दोन्ही चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. सीता म्हटले की शोभना समर्थ यांचा चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येत असे, अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामबाण’ चित्रपटातही त्यांना सीतेची भूमिका मिळाली. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि याच गोष्टीवरून त्या वेळी मोठा वाद निर्माण झाला होता.
टीका आणि बहिष्काराचे आवाहन
त्या काळातील एका प्रसिद्ध चित्रपटविषयक मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांनी शोभना समर्थ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता. गर्भवती महिलेने सीतेची भूमिका साकारणं धार्मिक भावनांच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मते शोभना यांची गर्भावस्था सीतेच्या आदर्श प्रतिमेशी जुळणारी नव्हती. एवढंच नाही, तर त्यांनी आपल्या परीक्षणात या चित्रपटाला ‘आजारी आणि अपवित्र तमाशा’ असं संबोधलं होतं. शोभना यांच्या वयावर आणि शारीरिक ठेवणीवरही त्यांनी टीका केली होती. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये, इतकंच नव्हे तर त्यावर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
या सगळ्या वादानंतरही शोभना समर्थ यांची सीतेच्या भूमिकेतील ओळख कायम राहिली. त्यांची नात आणि अभिनेत्री काजोल हिने एकदा त्यांचा उल्लेख ‘ओजी सीता’ असा केला होता. शोभना समर्थ यांच्या कुटुंबात त्यांच्या मुली तनुजा आणि नूतन यांचाही समावेश आहे. तनुजा यांच्या मुली काजोल आणि तनीषा या दोघीही मनोरंजन क्षेत्रातील परिचित अभिनेत्री आहेत. आज साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने शोभना समर्थ यांचा ७८ वर्षांपूर्वीचा अनुभव पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा