भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपला मित्र गुरनूर ब्रार याला पदार्पणाची संधी दिली. या सामन्यासाठी मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमधून वगळण्यात आले. ही निवड पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
क्राइस्टचर्च येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजाला संघातून वगळण्याच्या निर्णयावर गावस्कर यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते, फिरकी गोलंदाजांना कमी मदत मिळण्याची शक्यता असलेल्या खेळपट्टीवर या अनुभवी अष्टपैलू खेळाडूची गोलंदाजी उपयुक्त ठरली असती. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान न मिळाल्याने संघ निवडीवरून वाद निर्माण झाला आहे.
जडेजाच्या वगळण्यावर प्रश्नचिन्ह
गावस्कर यांच्या मते जडेजाला वगळण्याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. त्यांचे म्हणणे आहे की, जडेजा कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी प्रभावी ठरला असता. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रात जडेजा हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. या चक्रात भारताचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या जडेजाची फिरकी चौथ्या आणि पाचव्या दिवशी खूप उपयुक्त ठरली असती, असे गावस्कर म्हणाले.
सपाट खेळपट्ट्यांवरही चेंडूवर पकड मिळवून त्याला वळवण्यासाठी जडेजा ओळखला जातो, असेही गावस्कर यांनी नमूद केले. त्यामुळे मोहम्मद सिराजसोबतच जडेजासाठीही हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त सिराजबद्दल बोलले जात असताना जडेजाचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवड झाल्यावर संघ आपलाच
गावस्कर यांनी हेही स्पष्ट केले की, अंतिम अकरा, चौदा किंवा सोळा खेळाडूंबद्दल मनात काहीही शंका असल्या तरी एकदा संघ निवडला गेला की तो संघ आपलाच असतो. शेवटी हा भारतीय संघ आहे, त्यामुळे या संघाला पाठिंबा देत असल्याचे आणि या संघाने चांगली कामगिरी करावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे गावस्कर म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा