आगामी सीमांकन विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली आहे. विधेयक प्रत्यक्ष हातात आल्याशिवाय किंवा त्याचा अजेंडा स्पष्ट झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. संसदेचं अधिवेशन बोलावण्यात आलं असलं, तरी विधेयकाचा तपशील आणि अजेंडा अद्याप हातात आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं उदाहरण
कोणत्याही विधेयकावर भूमिका घेण्यासाठी ते विधेयक वाचणं महत्त्वाचं असल्याचं सांगताना सुळे यांनी परीक्षेचं उदाहरण दिलं. परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमाची माहिती असणं जसं आवश्यक असतं, तसंच विधेयकावर मत बनवण्यासाठी ते वाचणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं. विधेयक पाहिल्याशिवाय किंवा त्याचा अभ्यास केल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय कसा देऊ शकेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अधिकृत भूमिका लोकसभेतच
इंडिया आघाडीसोबत आपलं नियमित संभाषण सुरू असतं, असं सुळे यांनी सांगितलं. मात्र, सीमांकन विधेयकावर थेट चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नाही. पक्षाची अधिकृत भूमिका लोकसभेच्या कामकाजातच कळेल, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. देशहितासाठीच आपण कायम उभे असतो, असंही सुळे यांनी यावेळी अधोरेखित केलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा