, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिलजीतच्या मुंबई कॉन्सर्टला मनसेचा विरोध

दिलजीतच्या कॉन्सर्टला मनसेने विरोध केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील कार्यक्रमात अमली पदार्थ वापराची शक्यता असल्याचा आरोप करत पोलिसांना पत्र देणार आहे.

दिलजीतच्या मुंबई कॉन्सर्टला मनसेचा विरोध

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याचा लवकरच मुंबईत कॉन्सर्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कॉन्सर्टला विरोध केला असून, मुंबईत दिलजीतचा कार्यक्रम होऊच नये, अशी पक्षाची भूमिका आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात अमली पदार्थांचं सेवन होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

पोलिसांना पत्र, रास्ता रोकोचा इशारा

या प्रकरणी मनसे नेते आज ताडदेव पोलिसांना पत्र देणार आहेत. कॉन्सर्ट रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि सेवन उघडपणे होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे भविष्यात अशा ठिकाणी होणाऱ्या संगीतमय कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी पक्षाची मागणी आहे.

पहिल्याच कार्यक्रमात १२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह

महालक्ष्मी रेसकोर्सवर कॉन्सर्टच्या नव्या हंगामातील पहिल्याच कार्यक्रमात १२ जणांची अमली पदार्थ सेवन केल्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर दिलजीत दोसांझ याच्या आगामी कॉन्सर्टपूर्वी मनसेने पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता असल्याचा दावा पक्षाने केला असून, कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी याच ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात अमली पदार्थांच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एवढी मोठी घटना घडूनही अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आयोजित होत असल्याने मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. कॉन्सर्ट संपल्यानंतर तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसतात आणि त्याचा स्थानिक तरुणांवर चुकीचा परिणाम होत असल्याचं पक्षाच्या पत्रात म्हटलं आहे. याबाबत पालकांनीही मनसेकडे तक्रार केली आहे. याशिवाय, कॉन्सर्टमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो, असंही पक्षाने नमूद केलं आहे.

मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे हे ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन भविष्यात महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणार आहेत. पोलिसांकडून अशा कार्यक्रमांना परवानगी आणि संरक्षण दिलं जात असल्यामुळेच आयोजकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance