लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करणं एनडीएला अजूनही अवघड असल्याचं दिसत आहे. दोन्ही विधेयकं मंजूर करण्यासाठी एनडीएला दोन तृतियांश बहुमताची गरज आहे. स्वबळावर एनडीए हे विधेयक मंजूर करू शकत नाही. त्यामुळे इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. मात्र, एनडीएबाहेरच्या कोणत्याही राजकीय पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याची अद्याप घोषणा केलेली नाही.
केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. मागचं पावसाळी अधिवेशन सरकारने स्थगित केलं होतं, तेच पुढे सुरू होणार आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, एनडीएने आपली आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
३६० चा आकडा आणि सहा पक्षांची निर्णायक भूमिका
सध्या एनडीएकडे अधिकृतपणे केवळ ३२० खासदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जात आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी ३६० खासदारांची आवश्यकता आहे. लोकसभेच्या तीन जागा रिक्त आहेत, तसंच अध्यक्षांना वगळून मतदान करणाऱ्यांची संख्या ५३९ होते. अशा स्थितीत सहा राजकीय पक्ष असे आहेत की ते कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यामुळे हे सहाही पक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचं चित्र आहे.
पवार गट आणि डीएमकेची भूमिका
शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि डीएमके संसदेत सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा केलेली नाही, पण तसे संकेत मिळत आहेत. परिसीमन विधेयक देशाच्या हिताचं असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबाच राहील, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडी त्यावर विचार करेल, असंही त्या म्हणाल्या होत्या.
दुसरीकडे डीएमकेने अटी आणि शर्तींवर या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मुद्द्यावर भाजपला विरोध करण्याची गरज नाही, असं डीएमकेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तामिळनाडूची भागिदारी ७.२ टक्के राहण्याचं वचन मिळत असेल तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ शकतो, असं डीएमकेच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
एनसीपी आणि समाजवादी पार्टीकडे लोकसभेत एकूण ८ खासदार आहेत. डीएमकेचे २२ खासदार आहेत. पवार गट आणि डीएमके सोबत आल्यास हा आकडा ३५० वर जाणार आहे. त्यानंतरही एनडीएला १० खासदारांची गरज उरणार आहे. त्यामुळे विधेयकांचं भवितव्य सहा अपक्ष पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं चित्र आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा