सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, मोहिते पाटील गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत. या विजयामुळे मोहिते पाटील गटात आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पहिल्या निकालाने गटाचे बळ वाढल्याचे मानले जात आहे.
विजय माळशिरसच्या जनतेला समर्पित
विजयी झाल्यानंतर अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी हा विजय माळशिरस तालुक्याच्या जनतेला समर्पित केला. निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले. माळशिरस तालुका हा विजय दादांच्या विचारांवर नेहमीच चालत आला आहे, असे ते म्हणाले. सुख-दुःखात आणि प्रत्येक क्षेत्रात या तालुक्याने आपल्या कुटुंबाला खंबीर पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
उर्वरित निकालांकडे जिल्ह्याचे लक्ष
मतदारांनी भरघोस मताधिक्याने आपल्याला विजयी केले, असा विश्वास मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. या विजयामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणितांमध्ये मोहिते पाटील गटाचे वजन अधिक वाढले असल्याचे मानले जात आहे. आता उर्वरित जागांचे निकाल काय लागतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा