आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला १५,४०० रुपयांची वाढ होऊ शकते. तर प्रत्येक लाभार्थ्याला सरासरी ३.४० लाख रुपयांपर्यंत थकबाकी मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, हे आकडे जेपी मॉर्गन या जागतिक ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केलेल्या अंदाजावर आधारित आहेत.
१.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा?
जेपी मॉर्गनने आपल्या इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी रिपोर्ट २०२७ मध्ये आठव्या वेतन आयोगाबद्दल हे अंदाज मांडले आहेत. त्यानुसार देशातल्या सुमारे १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो. वेतन, भत्ते आणि पेन्शनमुळे सरकारवर आर्थिक वर्ष २०२८ आणि २०२९ मध्ये मिळून ७.२ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
१.८३ फिटमेंट फॅक्टरनुसार किती वाढणार पगार?
जेपी मॉर्गनने १.८३ फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून पगारवाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्याने ते वाढून ३३ हजार रुपये होऊ शकते. मात्र, मूळ वेतनात सध्या मिळणारा ६० टक्के महागाई भत्ता समाविष्ट केल्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढ १४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, केंद्रीय कर्मचारी संघटनांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास किमान मूळ वेतन १८ हजारांवरून जवळपास ६९ हजार रुपये होऊ शकते. हे सर्व आकडे अंदाजावर आधारित असून, वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि सरकारच्या निर्णयानंतरच प्रत्यक्ष वाढ स्पष्ट होईल.
प्रतिक्रिया व्यक्त करा