मिर्झापूर या लोकप्रिय वेबमालिकेत ललितची भूमिका साकारणारे अभिनेते ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील वर्सोवा परिसरातील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेह अंशतः कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भोपाळपासून मुंबईपर्यंतचा प्रवास
ब्रह्मा मिश्रा यांचे पूर्ण नाव ब्रह्मस्वरूप मिश्रा असे होते. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे त्यांचा जन्म झाला. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे प्रवेश घेतला. तेथे त्यांनी दोन वर्षांचा अभिनय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर चित्रपटांमध्ये संधी मिळवण्यासाठी ते मुंबईत आले. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. २०१३ मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘मांझी : द माउंटन मॅन’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘दंगल’, ‘केसरी’ आणि ‘हसीन दिलरुबा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
‘मिर्झापूर’मधून मिळालेली ओळख आणि दुर्दैवी शेवट
ब्रह्मा मिश्रा यांना खरी लोकप्रियता ‘मिर्झापूर’ या वेबमालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्यांनी ललित ही व्यक्तिरेखा साकारली होती. मुन्ना त्रिपाठीचा जवळचा मित्र असलेल्या ललितच्या भूमिकेतील त्यांचा सहज अभिनय आणि विनोदी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाथरूममध्ये तपासणी केली असता ब्रह्मा मिश्रा यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात घातपाताची शक्यता नसल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
प्रतिक्रिया व्यक्त करा