अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्यातील मजेशीर संवाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. दोघेही एकमेकांची फिरकी घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या नवव्या सत्रात पुन्हा एकदा या जोडीचा धमाल अंदाज पाहायला मिळाला.
फोनवरच झाली पोलखोल
या सत्रात अक्षय अभिनेता आणि राजकारणी रवी किशनसोबत सहभागी झाला होता. एका टास्कदरम्यान अक्षयला फोन करून समोरच्या व्यक्तीकडून एक विशिष्ट वाक्य बोलून घ्यायचे होते. त्यासाठी त्याने ट्विंकलला फोन केला आणि स्पीकरवर ठेवला. मात्र फोन उचलताच ट्विंकलने प्रेमाने बोलण्याऐवजी त्याच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली.
ट्विंकल म्हणाली की, आदल्या रात्री तिची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यात अक्षयने तिला सकाळी लवकर उठवले. सकाळी सहा वाजता कोण भजनं लावतं, असा सवाल तिने केला. त्यात अक्षय त्याहून मोठ्या आवाजात गात होता, असेही ती म्हणाली. तू स्वतःला अनुप जलोटा समजतोस का, असा टोला तिने लगावला. बाथरूमचे दार व्यवस्थित बंद करत जाण्याची आठवणही तिने करून दिली.
विनामोबदला सहभागावरही फिरकी
ट्विंकलच्या या तक्रारी ऐकून अक्षय काहीसा गोंधळला, तर करण जोहर आणि रवी किशन यांना हसू अनावर झाले. त्यानंतर ट्विंकलने अक्षय कुठे आहे, असे विचारले. अक्षयने आपण ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर असल्याचे सांगितले. ट्विंकलने आदल्या दिवशी करणशी बोलणे झाल्याचे सांगितले. करणने तिला रॅपिड फायर फेरीसाठी परीक्षक म्हणून येण्याचे निमंत्रण दिले होते.
मात्र अक्षय या शोमध्ये विनामोबदला सहभागी झाल्याचे समजताच तिने आश्चर्य व्यक्त केले. तू हे फुकट करतोयस, मला आश्चर्य वाटतंय, असे ती म्हणाली. त्यावर करणनेही मजेशीर उत्तर देत, म्हणजे तुला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे हवे असतात का, अशी विचारणा केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा