आजच्या धावपळीच्या जीवनात घर आणि बाहेरची कामं सांभाळणं अनेकांसाठी आव्हान बनलं आहे. नोकरी, मुलं आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे रोज संपूर्ण घर झाडणं आणि पुसणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. अशा वेळी घर स्वच्छ ठेवण्यासाठी स्पॉट क्लीनिंग ही सोपी आणि प्रभावी पद्धत कामी येऊ शकते. या पद्धतीमुळे वेळ वाचतो आणि घरही टापटीप राहतं.
स्पॉट क्लीनिंग म्हणजे काय?
स्पॉट क्लीनिंग म्हणजे संपूर्ण घर झाडण्याऐवजी फक्त तो विशिष्ट भाग स्वच्छ करणं, जिथे डाग पडला असेल, धूळ साचली असेल किंवा काही सांडलं असेल. अन्नाचे कण पडले असतील, पाणी सांडलं असेल किंवा पायांच्या खुणा उमटल्या असतील, तर तो भाग ओलसर कापड, मायक्रोफायबर कापड किंवा योग्य क्लिनरने लगेच स्वच्छ केला जाऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण फरशी झाडण्याची गरज पडत नाही.
स्वयंपाकघरात तेल किंवा अन्न सांडलं, जेवणाच्या टेबलाजवळ काही पडलं किंवा मुलांच्या खेळामुळे फरशी घाण झाली, तर ही पद्धत विशेष उपयुक्त ठरते. बाथरूमबाहेर पाण्याचे थेंब दिसले किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ घाण साचली, तरी ती लगेच स्वच्छ करता येते. लहान घाण तातडीने स्वच्छ केल्याने डाग पक्के बसत नाहीत आणि घर अधिक स्वच्छ दिसतं. ज्या घरांमध्ये लहान मुलं आणि पाळीव प्राणी आहेत, तिथे ही पद्धत आणखी उपयोगी ठरते.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
डाग काढण्यासाठी मायक्रोफायबर कापड, एक छोटा मॉप, पाण्याची स्प्रे बॉटल आणि फरशीसाठी योग्य क्लिनर या वस्तू जवळ असायला हव्यात. साधारण धूळ किंवा हलक्या डागांसाठी साधं पाणीही पुरेसं असू शकतं. मात्र फरशीच्या प्रकारानुसार क्लिनरची निवड करणं महत्त्वाचं आहे. जास्त पाणी वापरल्याने लाकडी फरशी खराब होऊ शकते, तर संगमरवरी फरशीवर आम्लयुक्त क्लिनर वापरणं टाळावं. स्वच्छता केल्यानंतर ती जागा कोरडी ठेवणंही गरजेचं आहे, जेणेकरून घसरण्याचा धोका राहणार नाही.
स्पॉट क्लीनिंगचा अर्थ असा नाही की संपूर्ण घर स्वच्छ करण्याची गरजच नाही. उलट, रोजचे छोटे डाग आणि घाण लगेच स्वच्छ करण्याची सवय लावल्यास घर स्वच्छ ठेवणं सोपं जातं. आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार अधिक वेळा संपूर्ण घर व्हॅक्यूमने स्वच्छ करावं. या छोट्या सवयींमुळे घर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न राहील.
प्रतिक्रिया व्यक्त करा