राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गृहप्रवेश सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर पार पडलेल्या या पारंपरिक सोहळ्यातील ऋतुजा यांचा साधा, सुंदर आणि पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमधून पवार कुटुंबातील लग्नानंतरच्या खास विधींची झलक पाहायला मिळते.
पारंपरिक लूकने वेधले लक्ष
गृहप्रवेश सोहळ्यासाठी ऋतुजा यांनी सुंदर दक्षिणात्य सिल्क साडी नेसली होती. पारंपरिक साडी, त्याला साजेसे दागिने आणि हलका मेकअप असा त्यांचा लूक होता. कोणताही भडकपणा न करता त्यांनी साधेपणातून सौंदर्य खुलवले. नववधूच्या या पारंपरिक अंदाजाला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. ऋतुजा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये गृहप्रवेशाच्या विधींचे खास क्षण टिपण्यात आले आहेत. लग्नानंतर नव्या घरात प्रवेश करताना पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारे विधी आणि कुटुंबीयांसोबतचे क्षण या छायाचित्रांतून पाहायला मिळतात.
ऋतुजा पाटील कोण आहेत?
ऋतुजा पाटील या सातारा जिल्ह्यातील फलटण इथले उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधून डिझाइन क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. जनसंपर्क आणि डिजिटल राजकीय संवाद या क्षेत्रांतही त्यांनी काम केले आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह 5 डिसेंबर 2025 रोजी बहारीन इथे पार पडला होता. चार दिवसांचा डेस्टिनेशन वेडिंग सोहळा 4 ते 7 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्याला पवार आणि पाटील कुटुंबातील सदस्यांसह जवळचे नातेवाईक आणि निमंत्रित उपस्थित होते. ऋतुजा यांनी शेअर केलेल्या गृहप्रवेशाच्या फोटोंमुळे त्यांच्या लग्नानंतरच्या खासगी सोहळ्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली असून त्यांच्या पारंपरिक लूकची आणि या सोहळ्यातील सुंदर क्षणांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा