वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांसाठीही उपलब्ध होणार आहे. राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे शनिवारी दुपारी २ वाजता रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या सुविधेसाठी बुलढाण्यात पाच रोबोटिक युनिट दाखल झाले आहेत. उद्घाटनाच्या दिवशीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांनंतर आता बुलढाण्यातही रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होत आहे.
रुग्णांना काय फायदा होणार
या सुविधेमुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक पातळीवर मिळणार आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची रुग्णांची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य सेवेला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय
रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट स्वतःहून शस्त्रक्रिया करत नाही, तर प्रशिक्षित शल्यचिकित्सक विशेष नियंत्रण प्रणालीच्या साहाय्याने रोबोटिक उपकरणे हाताळतात. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अधिक अचूकता, उत्तम नियंत्रण आणि सूक्ष्म हालचाली साधणे शक्य होते. शरीराच्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या भागांवरील शस्त्रक्रियांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. काही शस्त्रक्रियांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी रक्तस्राव, लहान छेद, कमी वेदना आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास आणि रुग्णालयातील मुक्कामाचा कालावधी कमी करण्यास मदत होऊ शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा