भारतीय टायर उत्पादक कंपनी जेके टायर अँड इंडस्ट्रीजने ईशान्य भारतातील ग्रामीण भागात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. कंपनीने मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे महिलेकडून चालवले जाणारे पहिले ग्रामीण टायर वितरण केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाची संधी मिळण्यासोबतच वाहनधारकांना टायर खरेदी आणि वितरणाची सुविधा जवळच्या परिसरात मिळणार आहे.
कंपनीने या उपक्रमाला ‘जेके वुमन रुरल डिस्ट्रिब्युटर’ असे नाव दिले आहे. ईशान्य भारतातील महिलांना वाहन क्षेत्रातील व्यवसायाशी जोडणे आणि ग्रामीण भागात टायरचे वितरण जास्त सोपे करणे हा यामागचा उद्देश आहे. मेघालयातील नॉन्गस्टॉइन येथे सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे संचालन स्थानिक उद्योजिका बैलांग लिंगदोह नोंगलैत करत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर महिला उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार आहे.
केंद्रात कोणकोणत्या वाहनांचे टायर मिळणार
हे वितरण केंद्र सुमारे १,२०० चौरस फुटांच्या जागेत उभारण्यात आले आहे. येथे प्रवासी कार, ट्रक, हलकी व्यावसायिक वाहने तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी टायरचा साठा ठेवण्यात आला आहे. यामध्ये पॅसेंजर कार रेडियल, ट्रक, लाइट कमर्शियल व्हेईकल आणि टू-व्हीलर व थ्री-व्हीलर टायरचा समावेश आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांसोबतच व्यावसायिक वाहन चालक आणि फ्लीट ऑपरेटर्सनाही या केंद्राचा फायदा होऊ शकतो.
जेके टायरचे व्यवस्थापकीय संचालक अंशुमान सिंघानिया यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, महिलांच्या उद्योजकीय कौशल्याला वाहन क्षेत्रातील रिटेल व्यवसायाशी जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील कस्टमरपर्यंत दर्जेदार टायर आणि सेवा पोहोचवण्यावरही कंपनी भर देत आहे.
सात राज्यांत विस्ताराची योजना
कंपनीने मागच्या वर्षी ग्रामीण वितरण नेटवर्क वाढवण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. आता त्याचा विस्तार ईशान्य भारतातील सर्व सात राज्यांमध्ये करण्याची योजना आहे. या भागातील जवळपास ८२ टक्के लोकसंख्या ग्रामीण परिसरात राहते. त्यामुळे अशा वितरण केंद्रांना मोठी संधी आहे. नॉन्गस्टॉइनपासून सुरू झालेला हा उपक्रम अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमधील ग्रामीण भागात महिला उद्योजकांसाठी व्यवसायाचे नवे मार्ग उघडू शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा