राज्य सरकारने जमिनीच्या अधिकार अभिलेखांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रत्येक पात्र सदनिकाधारकाला आता स्वतंत्र डिजिटल कार्ड म्हणजेच पूरक अधिकार अभिलेख दिला जाणार आहे. राज्यातील जमिनीची नोंदणी आणि मालकी हक्कांच्या अभिलेखांमध्ये मोठा बदल करण्याची तयारी सरकार करत आहे.
७/१२ उताऱ्याप्रमाणेच शहरांत स्वतंत्र नोंद
ग्रामीण भागातील जमिनींसाठी ७/१२ उतारा असतो, त्याच धर्तीवर नगर भूमापन क्षेत्रातील सदनिकांसाठीही स्वतंत्र नोंदीची व्यवस्था केली जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत इमारतीतील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवही तयार करण्यासाठी २०२६ चे नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
कार्डवर काय माहिती असणार?
सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि सामाईक क्षेत्राची स्वतंत्र नोंद या डिजिटल अभिलेखात असणार आहे. मसुदा नियमांवर ३० दिवसांत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर नियम अंतिम करून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे शहरांतील जमिनीशी संबंधित वाद कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा