देशात मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधीच्या विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच दोन वेगवेगळी मते समोर आली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला पाठिंबा असल्याचे संकेत दिले, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मसुदा वाचल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका नेमकी काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आव्हाडांची भूमिका काय?
पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आव्हाड यांनी प्रस्तावित विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते. शरद पवार यांनी यापूर्वीच परिसीमन ही घटनात्मक प्रक्रिया असल्याचे म्हटल्याचा दाखला त्यांनी दिला. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ आणि महिला आरक्षणाशी संबंधित तरतुदींना पाठिंबा देण्याबाबत पक्ष सकारात्मक असल्याचेही यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.
सुळेंची सावध भूमिका
मात्र आव्हाड यांच्या विधानानंतर पक्षाच्या खासदारांची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पक्षाची भूमिका सोमवारी सभागृहात कळेल, असे त्या म्हणाल्या. सर्वजण एकत्र बसून चर्चा करतील आणि त्यानंतरच पक्षाची भूमिका निश्चित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला आहे, असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचेही सुळे यांनी ठामपणे सांगितले. आव्हाड यांनी ५० टक्के जागा आणि महिला आरक्षण यासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधान केले असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मसुद्यातील बारकावे वाचल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयकावर चर्चा होण्यापूर्वीच पवारांच्या राष्ट्रवादीतील या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक झाल्यानंतर आणि विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतर पक्ष नेमकी कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा