, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

२६/११ स्मृतीदिन: इतिहास विसरणाऱ्याला भविष्य नसते – फडणवीस

२६/११ हल्ल्याच्या स्मृतीदिनी गेटवे ऑफ इंडियाजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. इतिहासातून शिकायला हवे, असे सांगत त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

२६/११ स्मृतीदिन: इतिहास विसरणाऱ्याला भविष्य नसते – फडणवीस

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आज स्मृतीदिन आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आणि त्यांनी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. या वेळी त्यांनी शहीदांच्या आठवणींना उजाळा दिला आणि दहशतवादाविरुद्ध देश एक असल्याचे सांगितले.

शहीद जवानांच्या शौर्याला सलाम

हल्लेखोरांनी जाणीवपूर्वक अशी ठिकाणे निवडली होती, जिथे जास्तीत जास्त नुकसान होईल आणि जास्तीत जास्त लोक मृत्युमुखी पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ताज आणि ट्रायडंटसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांचे नागरिक आणि राजदूत असतात. अशा ठिकाणी हल्ला करून संपूर्ण जगभरात भारतावर हल्ला केल्याचा संदेश त्यांना द्यायचा होता, असे त्यांनी सांगितले. जवानांनी हल्लेखोरांचा धैर्याने मुकाबला केला. करकरे, कामटे आणि साळसकर लढले. तुकाराम ओंबळे यांनी ओळखले की कसाब हा दहशतवादी आहे. त्याच्याकडे बंदूक होती, तर ओंबळे यांच्याकडे केवळ दांडुका होता. तरीही शरीरात गोळ्या लागल्या तरी त्यांनी कसाबला पकडले. कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड झाला आणि हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असल्याचे जगाने मान्य केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई कधीही थांबत नाही

हा दिवस आपण विसरू शकत नाही आणि विसरायचाही नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. हा संविधानावर झालेला हल्ला आहे. यापुढे असा हल्ला कधीही होऊ द्यायचा नाही, म्हणून एकीकडे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि दुसरीकडे दहशतवादाविरुद्ध एक असल्याचे सांगत आहोत. मुंबई थांबली नाही, मुंबई कधीही थांबत नाही. कितीही प्रयत्न झाले तरी आपला निर्धार कोणताही दहशतवादी थांबवू शकत नाही, हे मुंबई आणि महाराष्ट्राने दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले. पहलगामची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे, असेही ते म्हणाले. उरी आणि पहलगामनंतर भारताने आपले रौद्ररूप दाखवून दिले. ज्या ठिकाणी जवान आणि नागरिकांवर हल्ला होईल, तो भारत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांत मुंबईत किंवा देशात दहशतवादी घटना पूर्णपणे संपल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्री यांनी केला. इतिहासातून शिकायचे असते आणि भविष्याचा वेध घ्यायचा असतो. जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याला वर्तमान असते पण भविष्य नसते, असे सांगत त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance