राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा राबवले जाणार असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भेटीमागील राजकीय पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी सामंत यांची भेट घेतली आहे. खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार असलेले काळे आणि शिवसेना नेते सामंत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिंदे गट ठाकरे आणि शरद पवार गटाचे आमदार आपल्याकडे वळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रायगडातही फोडाफोडीचे राजकारण
दरम्यान, महायुतीतील पक्षांमध्येही फोडाफोडी सुरू असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसून आले. खोपोली शहरात मागील आठवड्यात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपच्या सुमारे १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा