कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास यांचा पासपोर्ट रेड फ्लॅग करण्यात आला असून त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सौरव दास हे ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमासाठी आणि पॅनेल चर्चेसाठी जात असताना दिल्ली विमानतळावर त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
पक्षाचे अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. मंगळवारी मध्यरात्री सौरव दास लंडनला जात होता. दिल्लीतील आंदोलन आणि त्याला मिळालेले यश याबाबत त्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठात लेक्चर होते. मग त्याला का थांबवण्यात आले, तो गुन्हेगार आहे का, असा सवाल दिपके यांनी केला.
हजारो कोटींचा घोटाळा केला असता तर…
सौरव दासचे एक चुकले, त्याने हजारो कोटींचा घोटाळा करायला हवा होता, असे दिपके म्हणाले. या सरकारने विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी यांना ज्या पद्धतीने देशाबाहेर जाऊ दिले, त्या पद्धतीने यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन बाहेर सोडले असते, असा टोला त्यांनी लगावला. सौरव दास हा भारतातील कॉकरोच जनता पार्टीची चळवळ आणि आंदोलनाची माहिती परदेशात जाऊन देईल, या भीतीने त्याला दिल्लीमध्येच अडवण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला.
सौरव दास हा ऑक्सफोर्ड विद्यापीठात जाऊन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणार होता, असे दिपके म्हणाले. पण केंद्र सरकारला हे नको आहे. केंद्र सरकारला चोर हवे आहेत, हे चोरांचे सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
सरकार कशाला घाबरतंय?
सौरवचा पासपोर्ट 2019 सालचा आहे आणि तो त्याला सरकारनेच दिला आहे. सौरव दोन वेळा परदेशात जाऊन आला आहे. त्याला परदेशातही प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळेच सरकारने हे कारस्थान रचले आहे, असा आरोप दिपके यांनी केला. या आधी सरकारला सौरवच्या पासपोर्टमध्ये त्रुटी दिसली नाही का, सरकारला इतकी भीती का आहे, सरकार कशाला घाबरतंय, असा सवाल त्यांनी विचारला.
या आधीही सरकारने दिल्ली आंदोलनाच्या वेळी आम्हाला विमानातून ताब्यात घेतले होते, असे दिपके म्हणाले. सरकार आम्हाला घाबरत नाही असा दावा करते, मग आमच्या आंदोलनाच्या वेळी दिल्ली मेट्रो का बंद ठेवली, दिल्लीमध्ये आणीबाणी का लावली, असा सवाल त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शाळेचा परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यावरूनही दिपके यांनी सरकारचा समाचार घेतला. सोनम वांगचुक यांना सरकारने त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले आहे, असे दिपके म्हणाले.
येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नागपुरात संविधान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
Leave a Reply