नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांची दोन दिवसांची भारतभेट हा केवळ एक राजनैतिक दौरा नव्हता, तर भारत-नेपाळ सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारी भेट होती. नेपाळमध्ये मार्च महिन्यात जेन-झीने मोठे आंदोलन उभे केले आणि त्यातून सत्तांतर झाले. बालेंद्र शाह यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भारतभेट ठरली.
१५ हजार कोटींची मदत आणि रेल्वेसेवा
बालेंद्र शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील थेट चर्चेत दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला. भारताने नेपाळला पंधरा हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले. अयोध्या-जनकपूर थेट रेल्वेसेवेला सुरुवात झाली, तर ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठीही सामंजस्य करार झाले. मोदी आणि बालेंद्र यांच्यातील चर्चेमुळे नवी दिल्ली आणि काठमांडू यांच्यात मध्यंतरी निर्माण झालेला दुरावा कमी होण्यास मदत होईल. दोन्ही देशांतील गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रिया या भेटीने सुरू झाली आहे.
चीनशी जवळीक आणि नात्याचे नवे पर्व
मध्यंतरी भारत-नेपाळ संबंधांत अंतर निर्माण झाले होते. नेपाळने चीनबरोबरचे संबंध आणि आर्थिक देवघेव वाढवली होती. त्यामुळे भारताच्या दृष्टीने काहीशी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भेटीमुळे हे मळभ दूर होण्यास मदत होऊ शकते. परराष्ट्र धोरण राबवताना दोन देशांच्या परस्पर अपेक्षा वाढतात, कधी अपेक्षाभंग होतो, तर कधी मतभेदही निर्माण होतात. मात्र, अशा वेळी संवादाचे दरवाजे खुले ठेवणे महत्त्वाचे असते. भारताने नेपाळबरोबर चर्चेचे आणि व्यापाराचे दरवाजे नेहमीच खुले ठेवले. संकट काळातही भारताने नेपाळला मदतीचा हात दिला आहे. भारत आणि नेपाळचे संबंध केवळ राजनैतिक पातळीपुरते मर्यादित नाहीत. या नात्याला ऐतिहासिक, भावनिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामाता हे दोन्ही देशांतील जनतेचे श्रद्धास्थान आहे. दोन्ही देशांतील लाखो नागरिकांचे परस्परांशी कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आहेत. बालेंद्र शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. जयशंकर यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. बालेंद्र हे नेपाळमधील नव्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतात. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास हा त्यांच्या राजकीय अजेंड्याचा प्रमुख भाग आहे.
Leave a Reply