रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘रामायण’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या २०व्या दिवशी दमदार कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने चांगली कमाई केली होती, मात्र तिसऱ्या सोमवारी कमाईचा वेग मंदावला होता. त्यानंतर निर्मात्यांनी तिकिटांच्या किमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
तिकीट दर कपातीनंतर कमाईत वाढ
निर्मात्यांनी तिकिटांच्या किमतींमध्ये ८० टक्क्यांपर्यंत कपात केली असून काही ठिकाणी हा चित्रपट ९९ रुपयांमध्ये पाहता येत आहे. या निर्णयानंतर २०व्या दिवशी चित्रपटाने १७.५० कोटी रुपयांची कमाई केली. याआधी १९व्या दिवशी चित्रपटाने १२.७० कोटी रुपयांची कमाई केली होती, जी आतापर्यंतची सर्वात कमी दैनंदिन कमाई ठरली होती.
२०व्या दिवशीच्या कमाईत हिंदी आवृत्तीचा वाटा १४.२५ कोटी रुपये राहिला. मल्याळम आवृत्तीने १.२५ कोटी, कन्नड आवृत्तीने ९० लाख, तमिळ आवृत्तीने ७० लाख आणि तेलुगू आवृत्तीने ४० लाख रुपयांची कमाई केली.
तिसऱ्या मंगळवारचा नवा विक्रम
१७.५० कोटींच्या कमाईसह ‘रामायण’ हा तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वीच्या चित्रपटांच्या तिसऱ्या मंगळवारच्या कमाईशी तुलना केली असता ‘धुरंधर’ने १७.२५ कोटी, ‘पुष्पा २’ने ११.५० कोटी, ‘केजीएफ २’ने ९.५७ कोटी, ‘धुरंधर २’ने ९.५० कोटी आणि ‘बाहुबली २’ने ६.९५ कोटी रुपयांची कमाई केली होती. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर यांच्यासह यश, आदिनाथ कोठारे आणि साई पल्लवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट आता १ हजार कोटी रुपयांच्या कमाईकडे वेगाने वाटचाल करत आहे.
Leave a Reply