भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेची तयारी सध्या वेगात सुरू आहे. या मोहिमेत जाणारे चारही अंतराळवीर रशियामध्ये प्रशिक्षण घेत असून, त्यांच्या सरावाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या दृश्यांमध्ये चारही अंतराळवीर हवेत तरंगताना आणि उलट्या कोलांट्या मारताना दिसत आहेत.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. पृथ्वीवर वस्तूंना जमिनीवर टिकवून ठेवणारे बल अंतराळात जाणवत नाही. त्यामुळे तिथे राहणे, हालचाल करणे आणि काम करणे हा अंतराळवीरांसाठी पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. म्हणूनच शून्य गुरुत्वाकर्षणाचा सराव या प्रशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
विशेष विमानातून चंद्र-मंगळाचे गुरुत्व
रशियाच्या आयएल-७६एमडीके या पॅराबोलिक विमानात हा सराव झाला. विमान वेगाने वर चढते आणि मग खाली झेप घेते. या प्रक्रियेमुळे काही क्षणांसाठी गुरुत्वाकर्षणात बदल जाणवतो. खास आखलेल्या उड्डाण मार्गांमुळे कमी गुरुत्वाच्या स्थितीचा अनुभव घेता येतो.
या सरावात चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाची स्थितीही निर्माण करण्यात आली. चंद्राचे गुरुत्व पृथ्वीच्या तुलनेत केवळ १८ टक्के असते. मंगळावरील गुरुत्व ३८ टक्के असते. या दोन्ही स्थितींचा अनुभव अंतराळवीरांनी घेतला. गुरुत्व कमी असताना शरीर कसे कार्य करते, हे समजून घेण्यास या सरावाची मदत होते. इतर ग्रहांच्या पृष्ठभागावर चालणे-फिरणे कसे असेल, याचीही कल्पना यातून येते.
चारही अंतराळवीर भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक
या पथकात विंग कमांडर शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर अंगद प्रताप यांचा समावेश आहे. चौघेही भारतीय हवाई दलाचे अनुभवी चाचणी वैमानिक आहेत. कठीण उड्डाण मोहिमांचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांची निवड इस्रोने केली आहे.
या चौघांच्या प्रशिक्षणात रशियातील गॅगरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमधील सराव आणि बंगळूर येथील इस्रोच्या केंद्रांमधील मोहिमेशी संबंधित विशेष तयारीचा समावेश आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा