बॉलिवूडच्या इतिहासात अनेक प्रेमकथा आजही चर्चेत राहतात. त्यापैकीच एक म्हणजे मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्यातील नातं. ऐंशीच्या दशकात या दोघांच्या जवळीकीबद्दल खूप बोललं गेलं. मात्र त्या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधी उघडपणे काही सांगितलं नाही. आता प्रसिद्ध छायाचित्रकार आणि दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल काही किस्से सांगितले आहेत.
सेटवर दर १५ मिनिटांनी फोन
लॉरेन्स डिसूझा यांनी सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्या काळात मिथुन विवाहित होते. तरीही श्रीदेवी यांच्यासोबतचं त्यांचं नातं सेटवर चर्चेचा विषय होता. शूटिंग सुरू असताना श्रीदेवी दर १५ मिनिटांनी मिथुन यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी सेट सोडून जायच्या, असं लॉरेन्स यांनी सांगितलं.
लॉरेन्स म्हणाले, मिथुनचा फोन दर १५ मिनिटांनी यायचा आणि श्रीदेवी लगेच त्याच्याकडे धावत जायची. ती दहा ते पंधरा मिनिटांचा शॉट देऊन मग फोनवर बोलायला निघून जायची. मिथुनही वारंवार सेटवर यायचे आणि मेकअप रूममध्ये बसून तिची वाट बघायचे. श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात होती आणि तेव्हा मिथुनचं लग्न योगिता बाली यांच्याशी झालं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
कधीकधी संध्याकाळी पॅक-अपच्या वेळी किंवा शूटिंग चालू असतानाही मिथुन सेटवर यायचे. ते श्रीदेवीच्या मेकअप रूममध्ये बसून तिची वाट बघायचे आणि शूटिंग संपल्यावर दोघं अनेकदा एकत्र निघून जायचे, असं लॉरेन्स यांनी नमूद केलं.
१९८४ मधील चित्रपट आणि नंतरची चर्चा
मिथुन आणि श्रीदेवी यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढल्याचं सांगितलं जातं. अनेक माध्यमांत असा दावा करण्यात आला होता की दोघांनी १९८५ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. पण मिथुन आणि श्रीदेवी यांनी याबद्दल कधीही काही सांगितलं नाही किंवा आपल्या नात्यावर उघडपणे भाष्यही केलं नाही.
१९८७ मध्ये एका मुलाखतीत मिथुन यांना त्यांच्या अफेअर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. वर्तमानपत्रांतील वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, असं त्यांना विचारलं असता मिथुन म्हणाले होते की, यातील काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही खोट्या आहेत. यावर आपल्याला काहीही बोलायचं नाही, असंही त्यांनी तेव्हा म्हटलं होतं.
Leave a Reply