छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या अनेक बदल पाहायला मिळत आहेत. नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना काही जुन्या मालिकांना निरोप घ्यावा लागत आहे. अशातच झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता हर्षद अतकरी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या आगमनामुळे कोणती जुनी मालिका बंद होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
‘देवमाणूस’च्या वेळेत बदल, मालिका बंद होणार नाही
झी मराठीवर येत्या ३० नोव्हेंबरपासून ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवीन मालिका रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे या वेळेत सध्या प्रसारित होणारी ‘देवमाणूस’ मालिका बंद होणार, असा अंदाज प्रेक्षकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र वाहिनीने ‘देवमाणूस’च्या वेळेत बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता किरण गायकवाड याची प्रमुख भूमिका असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका आता येत्या सोमवारपासून रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे ही मालिका बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘तुला जपणार आहे’बाबत चर्चा का?
दरम्यान, रात्री १०:३० वाजता प्रसारित होणारी ‘तुला जपणार आहे’ ही मालिका आता बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेत मीरा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री महिमा म्हात्रे हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. महिमाने मालिकेच्या सेटवरून एक सेल्फी फोटो शेअर केला असून, त्याला ‘आज काहीतरी वेगळं वाटतंय’ असे भावनिक कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने हार्ट आणि डोळ्यांत अश्रू असलेले इमोजीही लावले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीने मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची ही पोस्ट शेअर केली असावी, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तुला जपणार आहे’ मालिकेचा शेवटचा भाग २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत मालिकेच्या कलाकारांकडून किंवा झी मराठी वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मालिका खरोखरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की तिच्या वेळेत काही बदल होणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रश्न कायम आहेत.
Leave a Reply