डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील मिलापनगर आणि आसपासच्या भागात थेट नळातून येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, पिण्याच्या पाण्यात अळ्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे.
अळ्या थेट जलवाहिनीतून
मिलापनगरमधील काही बंगल्यांमध्ये नळातून येणाऱ्या पाण्यात लालसर अळ्या दिसल्या. या अळ्या इमारतीच्या साठवण टाकीतून नव्हे, तर थेट एमआयडीसीच्या जलवाहिनीतून येणाऱ्या पाण्यात असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. मिलापनगरमधील रहिवासी अश्विनी देशपांडे-कुलकर्णी यांना गेल्या दोन दिवसांपासून पाण्यात अळ्या आढळून येत होत्या. त्यांनी तातडीने मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरुण जोशी आणि कार्यकारिणी सदस्य राजू नलावडे यांना याबाबत माहिती दिली. मंगळवारी गुरुनानक जयंतीनिमित्त एमआयडीसी कार्यालयाला सुट्टी असल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संदेश पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
महिनाभरापूर्वीची तक्रार आणि आजारांचा धोका
महिनाभरापूर्वीही एमआयडीसीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावेळी प्रशासनाने पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. मात्र, या तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सध्या पाणीकपात सुरू असल्याने नागरिक आधीच पाणी जपून वापरत आहेत. त्यातच दूषित पाणीपुरवठ्यामुळे चिंता वाढली आहे. बालरोगतज्ज्ञांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली असून, दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि कावीळ यांसारख्या आजारांचा धोका संभवतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
एमआयडीसी प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासावेत, जलवाहिन्या आणि साठवण टाक्यांचं परीक्षण करावं, तसंच दूषित पाणीपुरवठ्याचं कारण शोधून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने आता एमआयडीसी प्रशासन काय कारवाई करणार, याकडे रहिवाशांचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply