कपड्यांवर डाग पडणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. चहा किंवा कॉफी पिताना कपड्यांवर थेंब उडतात, तर जेवताना तेल किंवा इतर पदार्थांचे डाग पडतात. काही डाग कितीही वेळा कपडे धुतले तरी सहज निघत नाहीत. अशावेळी आवडते कपडे खराब होण्याची भीती वाटते. मात्र महागड्या ड्राय क्लीनिंगचा पर्याय निवडण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय करून पाहता येतात.
चहा-कॉफीचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा
चहा किंवा कॉफी पिताना कपड्यांवर डाग पडणे सामान्य आहे. हे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर करता येतो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डाग पडलेल्या जागेवर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने तो भाग स्वच्छ करून कपडा धुवा. यामुळे चहा-कॉफीचे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते.
शाईचे डाग काढण्यासाठी कच्चे दूध
अनेकदा पेनची शाई कपड्यांवर लागते. विशेषतः लहान मुलांच्या गणवेशावर किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या शर्टवर असे डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करता येतो. ज्या भागावर शाईचा डाग पडला आहे, तो भाग काही वेळ कच्च्या दुधात भिजवून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने कपडा चोळून स्वच्छ करा. दुधामधील फॅट्स आणि प्रथिने शाईचा डाग सैल करण्यास मदत करू शकतात.
लिपस्टिकचे डाग काढण्यासाठी अल्कोहोल
आवडत्या टॉप, शर्ट किंवा ड्रेसवर लिपस्टिकचा डाग पडल्यास तो काढणे कठीण जाते. अशावेळी अल्कोहोलचा वापर करता येतो. एका स्वच्छ कापसाच्या बोळ्यावर किंवा कापडावर थोडे अल्कोहोल घ्या. त्यानंतर डाग असलेल्या भागावर हलक्या हाताने टिपा. डाग जोरात घासू नका, त्यामुळे तो आणखी पसरू शकतो. डाग कमी होईपर्यंत ही प्रक्रिया काळजीपूर्वक करा. मात्र अल्कोहोल वापरण्यापूर्वी कपड्याच्या उलट्या भागावर टेस्ट करा. रेशमी, नाजूक किंवा ड्राय क्लीनिंग आवश्यक असलेल्या कपड्यांवर घरी प्रयोग करू नका.
Leave a Reply