मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सुळेंना केंद्रीय मंत्रिपद, पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर

रामदास आठवले यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केले. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद तर दुसऱ्या खासदाराला राज्यमंत्रीपद मिळेल, असे ते म्हणाले.

सुळेंना केंद्रीय मंत्रिपद, पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर

देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एनडीएमध्ये सामील होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही पवार यांना येण्याची विनंती केली आहे. पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घ्यावा, असे आठवले म्हणाले.

आठवलेंची पवारांना ऑफर

पवार हे विधेयकाला पाठिंबा देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी थेट आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. त्यांचे आठ खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल. त्याशिवाय आणखी एका खासदाराला राज्यमंत्रीपद मिळेल. तसेच राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मंत्रीपद दिली जातील, असे मोठे विधान आठवले यांनी करत पवार यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रामदास आठवले आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले.

इतर विषयांवर भाष्य

संजय राऊत यांनी एका खासदाराला मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी १५० कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर उत्तर देताना आठवले यांनी राऊत आमच्या बाजूने आले तरी त्यांना एक कोटी रुपयेही देणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तसेच हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता असून, त्यासाठी हिवाळी अधिवेशन किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, झेन झी पिढीमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. अभिजित दीपके यांनी पेपरफुटी प्रकरणात केलेल्या आंदोलनाला यश मिळाले, असे ते म्हणाले. मात्र त्यांनी अमेरिकेत ‘कॉकरोच पार्टी’ स्थापन केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आंदोलन करावे, अशी मिश्किल टिप्पणीही आठवले यांनी केली.

दुसरीकडे, मुंबईतील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला होत असलेल्या विलंबावरही त्यांनी भाष्य केले. स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ३५० फूट ठेवण्याची मागणी आहे. त्यामुळे पुतळ्याच्या निर्मितीला वेळ लागत असून, परिणामी स्मारकाचे काम रखडल्याचे आठवले यांनी सांगितले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance