अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका जाहीर कार्यक्रमात स्टेजवर उपस्थित असलेली विद्यार्थिनी खाली पडताच मुंढे तात्काळ तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तिला उठण्यासाठी हात दिला आणि तिची विचारपूस केली. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
कडक अधिकारी, संवेदनशील व्यक्ती
तुकाराम मुंढे हे कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून त्यांनी कारभार हाती घेतल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. दिवाळीपूर्वीही त्यांच्या विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून माल जप्त केला आणि अटकेची कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मुंढे एका कार्यक्रमाच्या स्टेजवर दिसत आहेत. यावेळी स्टेजवर असलेली विद्यार्थिनी खाली पडली. त्यावेळी काही लोक तिच्या मदतीला धावून आले आणि मुंढे हे देखील तात्काळ तिच्याकडे गेले. त्यांनी तिला उठण्यासाठी हात दिला आणि स्टेजखाली असलेल्या लोकांना शांत राहण्यास सांगितले. या व्हिडीओवर लोक मोठ्या संख्येने कमेंट करत आहेत. मोठेपण पदात नाही, तर मदतीच्या भावनेत असते, अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत. कडक अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांच्यातील एक वेगळी, संवेदनशील बाजू यावेळी पाहायला मिळाली.
Leave a Reply