रात्रीच्या आकाशातील तारे, चंद्रावरील खड्डे आणि दूरच्या आकाशगंगा स्वतःच्या कॅमेऱ्यात टिपण्याची इच्छा अनेकांना असते. पण आतापर्यंत हे काम अवजड उपकरणे, तारांचे जंजाळ आणि थंडीत रात्रभर जागरण यामुळे सामान्य माणसासाठी कठीण होते. आता ही अडचण दूर करणारी स्मार्ट दुर्बीण बाजारात आली आहे.
झोपेत असतानाही फोटो तयार
वापरकर्त्याने अॅपमध्ये आवडता तारा किंवा आकाशगंगा निवडून वेळ ठरवली की दुर्बीण मध्यरात्री आकाश निरभ्र असताना स्वतःहून सुरू होते. ती लक्ष्य शोधते, अचूक फोकस करते, शेकडो फोटो टिपते आणि त्यांचे एकत्रीकरण करून सकाळी वापरकर्त्याच्या स्मार्टफोनवर तयार चित्र पाठवते. वापरकर्त्याला रात्रभर जागण्याची गरज नाही.
तांत्रिक वैशिष्ट्ये
दिसायला आधुनिक कॅप्सूल किंवा कंदीलासारखे असलेले हे उपकरण साडेपाच किलो वजनाचे आहे. त्यात ९० मिलिमीटरचा ऑप्टिकल सेन्सर आणि ३४० मिलिमीटरची फोकल लेंथ आहे. लहान स्मार्ट दुर्बिणींच्या तुलनेत ती तिप्पट अधिक प्रकाश गोळा करू शकते. आकाशगंगेचे विस्तीर्ण दृश्य टिपण्यासाठी स्वतंत्र वाईड अँगल कॅमेरा आहे. ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा अंधारात पिक्सेल एकत्र करून तेजोमेघांचे सूक्ष्म तपशील टिपतो, तर सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या छायाचित्रणासाठी पूर्ण क्षमतेने काम करतो. त्यामुळे चंद्रावरील विवरे आणि शनीची कडी स्पष्ट दिसतात.
फिरणारा सेन्सर आणि इतर सुविधा
पृथ्वीच्या फिरण्यामुळे तारे सरकतात आणि दीर्घकाळ फोटो काढताना त्यांचे ठिपके रेषांसारखे दिसतात. ही अडचण दूर करण्यासाठी दुर्बिणीत फिरणारा सेन्सर बसवण्यात आला आहे. त्यामुळे नासाच्या हबल दुर्बिणीने टिपलेल्या रंगीबेरंगी तेजोमेघांसारखे फोटो एका क्लिकवर मिळू शकतात. सूर्यग्रहण किंवा सूर्यावरील डाग पाहण्यासाठी सुरक्षित एनडी फिल्टरची सोय आहे. स्मार्टफोन दुर्बिणीला टेकवताच अॅप सुरू होते आणि ऑगमेंटेड रिॲलिटी नकाशाच्या मदतीने आकाशात काय दिसत आहे, हे स्क्रीनवर समजते. धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित असलेल्या या उपकरणासोबत मजबूत अॅल्युमिनियम ट्रायपॉड मिळतो. जागतिक बाजारात या तंत्रज्ञानाची किंमत भारतीय चलनात अंदाजे एक लाख २० हजार ते एक लाख ३५ हजार रुपयांच्या घरात आहे.
Leave a Reply