धाराशिव लोकसभा मतदारसंघात २०२९ च्या निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. विद्यमान खासदार शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर असताना, पक्षाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण शंभर टक्के निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाकडे विद्यमान खासदारांना दिलेले आव्हान म्हणून पाहिले जात आहे.
निंबाळकरांचा मिश्किल टोला
चौगुले यांच्या विधानावर निंबाळकर यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. पक्षातील एकता आणि एकवाक्यता २०२९ ची निवडणूक लागल्यानंतर दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमेदवारीच्या इच्छेबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मला उद्या अमेरिकेचा राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे, मग तुम्ही मला अडवणार का?’ या उपरोधिक विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
पीकविम्यावरून श्रेयवाद
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या खरीप पीकविम्याच्या २२७ कोटी रुपयांच्या भरपाईवरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद रंगला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या यशाचे श्रेय आपल्या पाठपुराव्याला दिले. तर माजी आमदार चौगुले यांनी धाराशिवमध्ये पत्रकार परिषद घेऊन भरपाईसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
याबद्दल विचारले असता निंबाळकर म्हणाले की, ज्यांनी पाठपुरावा केला त्यांना श्रेय घेण्यास हरकत नाही; मात्र यशाचे श्रेय घेताना अपयशाचेही श्रेय घेतले पाहिजे. केंद्र सरकारच्या कामांच्या ठिकाणी, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गावर जाऊन काहीजण रील काढतात, अशी टिप्पणीही त्यांनी नाव न घेता केली. त्यामुळे पीकविम्याच्या विजयावरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.
Leave a Reply