मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मालवणी बोलीभाषेचा शब्दकोश तयार करणार; मंत्री उदय सामंत

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्गात भाषा केंद्र उभारणार; मालवणी बोलीवर संशोधन व शब्दकोशाचे प्रयत्न. रत्नागिरीत एमपीएससी-यूपीएससी अकॅडमी सुरू होणार.

मालवणी बोलीभाषेचा शब्दकोश तयार करणार; मंत्री उदय सामंत

मालवणी बोलीभाषेचा शब्दकोश तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी भाषा कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून, तेथे मालवणी बोलीभाषेवर संशोधन केले जाईल. पुढच्या पिढीला या बोलीची ओळख व्हावी, हाच या प्रयत्नांमागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या ‘केपीएल अश्वमेध-२०२५’ गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. रविवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, पत्रकार शेखर सामंत, संजीवनी देसाई, सुलभा देसाई, वेंगुर्ल्याचे उपसभापती सचिन देसाई, गौड ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष तथा केपीएलचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील आणि पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू यांच्यासह सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव भागांतील पदाधिकारी व ज्ञातीबांधव उपस्थित होते.

रत्नागिरीत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकॅडमी

रत्नागिरीत लवकरच मोफत एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकॅडमी सुरू केली जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. मालवणी बोली ही सर्वात गोडवा असलेली बोली असल्याचे सांगत त्यांनी या बोलीच्या जतनावर भर दिला.

प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून ‘केपीएल अश्वमेध’ हा गौरवग्रंथ प्रेरणादायी ठरेल, असे सामंत म्हणाले. केपीएल महोत्सवाला सातत्याने पुढे नेण्यासाठी दरवर्षी आयोजन व्हावे आणि त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्ञातीतील अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत असून राजकारणातही ज्ञातीने वेगळा ठसा उमटविला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मनीष दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रफुल्ल वालावलकर यांनी आभार मानले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance