पश्चिम बंगाल राज्याचं नाव बदलण्याच्या दिशेनं तेथील सरकारनं मोठं पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. राज्याचं नाव बदलून ‘पश्चिम बंगा’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्याच्या इंग्रजी नावातही बदल करण्याचा विचार आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपात आलेले सुवेंदू अधिकारी सध्या बंगालचे मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक जुने नियम बदलले आहेत.
९ डिसेंबरला प्रस्ताव, अधिवेशन ४ ते १४ डिसेंबर
मिळालेल्या माहितीनुसार, नामांतराचा प्रस्ताव येत्या ९ डिसेंबर रोजी विधानसभेत दाखल केला जाणार आहे. त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली असून, आगामी अधिवेशनात हा प्रस्ताव पटलावर ठेवण्याचं ठरवण्यात आलं आहे. बंगालच्या विधानसभेचं अधिवेशन ४ ते १४ डिसेंबर या काळात असणार आहे आणि याच अधिवेशनात ९ डिसेंबरला नामांतराचा प्रस्ताव दाखल केला जाईल.
पश्चिम बंगाल या राज्याला इंग्रजीत वेस्ट बंगाल म्हटलं जातं. प्रस्तावानुसार, राज्याला इंग्रजीमध्येही ‘पश्चिम बंगा’ असंच संबोधलं जावं, असा प्रयत्न आहे.
विधानसभेत मंजुरीनंतर केंद्राकडे प्रस्ताव
विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे थेट राज्याचं नाव बदललं असं होत नाही. त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरीही आवश्यक असते. विधानसभेत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. केंद्राच्या मंजुरीनंतर रितसर पश्चिम बंगालचं नाव बदललं जाईल. याआधी केरळ राज्याचं नामकरण ‘केरळम’ असं करण्यात आलं होतं.
Leave a Reply