किडनीतील गाठ काही वेळा किडनीपुरती मर्यादित न राहता मोठ्या रक्तवाहिन्यांमधून हृदयापर्यंतही पोहोचू शकते. अशा दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या प्रकरणावर ठाण्यातील एका रुग्णालयातील बहुविशेषज्ञ पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ३८ वर्षीय महिलेच्या उजव्या किडनीतील गाठ हृदयाच्या उजव्या भागापर्यंत पसरली होती, तरीही तिच्यावरचे उपचार यशस्वी झाले आणि सहाव्या दिवशी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
लक्षणे आणि निदान
या महिलेच्या पोटाच्या उजव्या बाजूला गाठ जाणवत होती. तिला सर्वसाधारण अशक्तपणा, भूक मंदावणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणे होती. तपासण्यांमध्ये तिच्या उजव्या किडनीमध्ये मोठी गाठ असल्याचे आढळले. ही गाठ इन्फेरिअर व्हेना कावा या शरीराच्या खालच्या भागातून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या प्रमुख रक्तवाहिनीमध्ये पसरली होती आणि पुढे हृदयाच्या उजव्या भागापर्यंत पोहोचली होती. या स्थितीला लेव्हल फोर ट्यूमर थ्रोम्बस असे म्हटले जाते. या वर्गीकरणानुसार ट्यूमरचा रक्तवाहिन्यांमधील विस्ताराची ही सर्वाधिक प्रगत अवस्था आहे.
किडनीच्या कर्करोगाच्या काही रुग्णांमध्ये ट्यूमरची वाढ किडनीमधून रेनल व्हेनमध्ये आणि त्यानंतर इन्फेरिअर व्हेना कावामध्ये होऊ शकते. प्रगत अवस्थेत हा ट्यूमर हृदयापर्यंत पोहोचू शकतो. ट्यूमरचा विस्तार किती झाला आहे, हे सविस्तर इमेजिंग तपासण्यांद्वारे निश्चित केले जाते आणि त्यानुसार तज्ज्ञ शस्त्रक्रियेचे नियोजन करतात.
बहुविशेषज्ञ पथकाची शस्त्रक्रिया
या प्रकरणात ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्सच्या बहुविशेषज्ञ पथकाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. यामध्ये किडनीतील ट्यूमर तसेच इन्फेरिअर व्हेना कावा आणि हृदयापर्यंत पसरलेला त्याचा भाग काढण्यात आला. यासोबतच प्रभावित रक्तवाहिनीची दुरुस्ती, पोटातील मोठ्या रक्तवाहिन्यांच्या आसपासच्या लिम्फ नोड्स काढणे आणि पोटाच्या स्नायूंमधील अंतरामुळे निर्माण झालेल्या डायव्हरिकेशन ऑफ द रेक्टाय या स्थितीची दुरुस्ती करण्यात आली.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अजित गुजेला, डॉ. संदीप परब, डॉ. सौम्य शेखर जेना समंत, डॉ. सानिया पांड्रोवाला, डॉ. नीरज शेट्टी, डॉ. संगीता शेट्टी आणि डॉ. लीना तायशेटे यांनी समन्वयाने काम केले. ट्यूमर हृदयापर्यंत पोहोचल्यास कार्डिओपल्मनरी बायपास म्हणजेच हार्ट-लंग मशीनचा वापर करावा लागू शकतो. या यंत्राच्या मदतीने शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताभिसरण आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवता येतो.
या शस्त्रक्रियेदरम्यान अंदाजे ४०० मिली रक्तस्राव झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक होती. कोणतीही शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत न होता तिची प्रकृती सुधारली आणि सहाव्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पोटात सतत जाणवणारी गाठ, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे, भूक मंदावणे आणि सर्वसाधारण अशक्तपणा यांसारखी लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा वाढत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. किडनीच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच ठळक लक्षणे दिसतात असे नाही, त्यामुळे योग्य वेळी वैद्यकीय मूल्यांकन करणे महत्त्वाचे ठरते.
Leave a Reply